सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) नेते महेश कोठे यांचे मंगळवारी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान करत असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली. ते 60 वर्षांचे होते.
ही घटना सकाळी साधारण साडेसात वाजता गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर घडली. निकटवर्तीयांनी सांगितले की, कोठे मकर संक्रांतीच्या निमित्ताने अमृत स्नानासाठी त्रिवेणी संगमावर गेले होते. नदीत स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोठे यांचे पार्थिव बुधवारी अंत्यसंस्कारासाठी सोलापूरला नेण्यात येणार आहे. महेश कोठे यांनी 20 नोव्हेंबर रोजी सोलापूर (उत्तर) विधानसभा क्षेत्रातून भाजपचे विजय देशमुख यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
प्रयागराजमध्ये कडाक्याची थंडी आहे. मकर संक्रांतीनिमित्त विविध आखाड्यांच्या साधू-संतांनी महाकुंभातील पहिल्या अमृत स्नानाचा लाभ घेतला. सकाळी 8:30 वाजेपर्यंत 1.38 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात डुबकी घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (SP) प्रमुख शरद पवार यांनी कोठे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “माझे जुने सहकारी महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन झाले. महेश कोठे यांचा सोलापूर शहराच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रावर महत्त्वाचा प्रभाव होता. त्यांच्या निधनामुळे सोलापुराने एक गतिशील आणि समर्पित कार्यकर्ता गमावला आहे. आम्ही सर्व या दुःखाच्या प्रसंगी कोठे कुटुंबासमवेत आहोत.