लाडक्या बहीणींसाठी खुषखबर! जानेवारीच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली समोर

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात.

निवडणुकीपूर्वी महायुतीने पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महिलांना नुकताच डिसेंबरचा हप्ता मिळाला असून आता 2100 रुपये कधी मिळतील, याची चर्चा सुरू आहे. लाडक्या बहिणींची नजर आता जानेवारीच्या हप्त्यावर आहे.

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

राज्य सरकारने डिसेंबर महिन्यातील हप्ता 24 डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे, जानेवारी महिन्याची रक्कम लवकरच जमा होईल, अशी अपेक्षा आहे. याच दरम्यान, महायुती सरकारमधील नेते छगन भुजबळ यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.

छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांनी स्वतःहून योजनेतून आपले नाव काढावे. आतापर्यंत दिलेली रक्कम परत मागण्यात अर्थ नाही, ती महिलांना अर्पण केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

2100 रुपये कधी मिळणार?

महायुती सरकार पुन्हा स्थापन झाल्याने महिलांना 2100 रुपये मिळतील का, याबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच 2100 रुपयांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर महिन्यात 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवण्यात आले होते. आता जानेवारी महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.