मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणा वेगाने कार्यरत झाल्या आहेत. मंगळवारी सीआयडीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती आणि त्याच्यानंतर कराडच्या संतोष देशमुख हत्येशी असलेल्या संबंधांचा शोध घेण्यासाठी सीआयडीने त्याची कोठडी मागितली आहे.
सीआयडीने कोर्टात खंडणी प्रकरणात संतोष देशमुख अडथळा ठरत होते, यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी मोक्का अंतर्गत कारवाईनंतर बुधवारी सीआयडीने वाल्मिक कराडचा ताबा घेतला आणि त्याला बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं.
सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या सहभागाची चौकशी करण्याची गरज असल्याचं कोर्टात सांगितलं. त्याचबरोबर, हत्या झालेल्या दिवशी कराड, विष्णू चाटे, आणि सुदर्शन घुले यांच्यात मोबाइलवर संवाद झाल्याचे सीडीआर पुरावे कोर्टात सादर करण्यात आले.
तपास अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या संभाषणाचा तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने सात दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, कराडच्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणत्याही आरोपीने कराडचे नाव घेतलेले नाही.