बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात अज्ञात व्यक्तीकडून चाकूहल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर तब्बल 6 वार केले असून, दोन जखमा खोलवर आहेत. त्यातल्या एका जखमेचे ठिकाण सैफच्या मनक्यावर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. सैफ अली खानच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे फोन देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सैफच्या मोलकरणीचा जबाब नोंदवला आहे, ज्यातून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, काल रात्री एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि मोलकरणीसोबत जोरदार वाद घालू लागला. सैफने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी त्या व्यक्तीने सैफवरच हल्ला केला.
मुंबई पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार करणाऱ्या मुख्य गुन्हेगाराला पकडण्यासाठी तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. त्याचे सैफशी भांडण झाले, ज्यामध्ये सैफला चाकूने जखमा झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्यही घरात उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तथापि, घुसखोराचा घरात चोरी करण्याचा हेतू होता की आणखी काही याचा तपास पोलिस अजूनही करत आहेत.