Encounter : बदलापूरमधील शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेला एन्काऊंटर म्हणून मांडले होते. मात्र, आता न्यायालयाने या एन्काऊंटरला बनावट ठरवत, अक्षयच्या मृत्यूसाठी पोलिसांना जबाबदार ठरवले आहे.
पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी गोळ्या झाडल्याचा दावा केला होता, पण न्यायलयीन समितीने पोलिसांचे हे स्पष्टीकरण संशयास्पद असल्याचे नमूद केले आहे. अक्षयच्या मृत्यूनंतर देशभरात मोठा वादंग उठला होता. काहींनी पोलिसांच्या कृतीचे समर्थन केले, तर अनेकांनी यावर तीव्र टीका केली.
विरोधकांनी हा एन्काऊंटर पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यामते, गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे काम न्यायालयाचे असून, पोलिसांनी कायदा हातात घेतल्याचे ते म्हणाले होते. आता न्यायालयीन समितीनेही या दाव्याला दुजोरा दिला आहे, ज्यामुळे एन्काऊंटर बनावट असल्याचे समोर आले आहे.
अक्षय शिंदेच्या आईने या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुलाचा बचाव करताना सांगितले, “माझा मुलगा निर्दोष होता, त्याने काहीही गुन्हा केला नव्हता. आता कोर्टाच्या निर्णयानंतर मला समाधान वाटत आहे.” तिने मुलावरचा बलात्काराचा आरोप खोटा असल्याचा दावा करत, मुलाला मारण्याचा कट रचण्यात आल्याचे भावनिक उद्गार काढले.
या अहवालाने पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा गैरवापर करून एन्काऊंटरची नाट्यमय योजना आखल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयानेही या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे.