Dhule : शिक्षकाला ब्लॅकमेल केल्या प्रकरणी तरुणीला तुरूंगवास, २ दिवसांनी जेलमध्ये केलं भयानक कृत्य, कुटुंबीयांचा आक्रोश

Dhule : धुळे जिल्हा कारागृहात चंद्रमा बैरागी या २० वर्षीय महिला कैदीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुरुंगाच्या शेजारी असलेल्या बाथरुमजवळ तिने ओढणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही महिला दोन दिवसांपूर्वीच न्यायालयीन कोठडीत दाखल झाली होती. तिच्या आकस्मिक मृत्यूची नोंद धुळे शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या घटनेची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
आत्महत्येची घटना कशी घडली?
कारागृह अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमा बैरागी दोन दिवसांपूर्वी देवपूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कारागृहात दाखल झाली होती. मंगळवारी सकाळी ती महिला विभागातील बाथरुममध्ये गेली आणि तिथेच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कारागृह अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सेक्सटॉर्शन प्रकरणातील आरोपी
चंद्रमा बैरागी नंदुरबार येथील एका शिक्षकाला ब्लॅकमेल करण्याच्या सेक्सटॉर्शन प्रकरणात आरोपी होती. शिक्षकाकडे १२ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी तिच्यासह इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी म्हणून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
आत्महत्येनंतर पोलिसांवर आरोप
चंद्रमा बैरागीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.