Vinayakan : मल्याळम-तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विनायकन याच्यावर वादग्रस्त व्हिडिओमुळे पुन्हा एकदा टीकेचा भडिमार होत आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून देशभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या विनायकनच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
या व्हिडिओमध्ये तो बाल्कनीतून जोरजोरात ओरडताना दिसतो, ज्यामुळे शेजाऱ्यांशी वाद घालत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः त्याच्या असभ्य भाषेचा आणि लुंगी वारंवार हटवण्याच्या वर्तनाचा समाज माध्यमांवर तीव्र निषेध केला जात आहे.
व्हिडिओनंतर जाहीर माफी
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, विनायकनने(Vinayakan) फेसबुक पोस्टद्वारे जाहीर माफी मागितली आहे. त्याने आपल्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त केला असून, समाजाप्रती नकारात्मक उर्जा पसरवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. वैयक्तिक समस्यांमुळे असे वर्तन घडल्याचे नमूद करत, भविष्यामध्ये असे प्रकार पुन्हा न घडण्याचे आश्वासनही दिले आहे.
पूर्वीचे वादग्रस्त प्रसंग
विनायकनवर यापूर्वीही सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचे आरोप झाले आहेत. कोचीमधील पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती, तर गोव्यातील घटनेत दारूच्या नशेत हैदराबाद विमानतळावर गोंधळ घालल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले होते. अशा घटनांमुळे त्याच्या वर्तनावर टीका होत असून, काही जण त्याच्या अभिनय कारकिर्दीवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
या नव्या वादानंतरही विनायकनवर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.