Chhawa : ‘लेझीमवर नृत्य करणं हे…’; ‘छावा’ चित्रपटाला वाढत्या विरोधानंतर संभाजीराजेंनीही स्पष्ट केली भूमिका

Chhawa: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या सिनेमाचे पहिले पोस्टर आणि ट्रेलरची घोषणा करण्यात आली होती.

लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत, तर दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कौतुकाबरोबरच काही मुद्द्यांवर चित्रपटाला विरोध देखील होत आहे.

ट्रेलरमधील वादग्रस्त दृश्य

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई लेझीम नृत्य करताना दिसतात. हा दृश्य शिवप्रेमींना खटकला असून, काही संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराचे समन्वयक सचिन आडेकर यांनी यावर तीव्र विरोध दर्शवत, “छावा” चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या विरोधानंतर चित्रपटाविषयी चर्चा अधिकच तापली आहे.

संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

या वादावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, लक्ष्मण उत्तेकर आणि त्यांच्या टीमने मुंबईत त्यांची भेट घेतली होती आणि चित्रपटाची काही दृश्ये दाखवली होती. तेव्हा संभाजीराजेंनी संपूर्ण चित्रपट दाखवण्याची विनंती केली होती, परंतु अद्याप त्यांना चित्रपट दाखवण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांनी चित्रपटाला हिरवा कंदील दिलेला नाही.

लेझीम हा सांस्कृतिक ठेवा आहे, आणि छत्रपती संभाजी महाराजांना लेझीम खेळताना दाखवणे काही गैर नाही. मात्र, गाण्याच्या स्वरूपात आनंदोत्सव साजरा करण्याचा सीन सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून कितपत योग्य आहे, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. इतिहासकार आणि तज्ञांनी यावर सखोल चर्चा करावी, असे संभाजीराजे म्हणाले.

निर्मात्यांची जबाबदारी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट १००-२०० कोटींच्या बजेटमध्ये तयार होत आहे, आणि दिग्दर्शक उत्तेकर मराठी असल्याने या चित्रपटात कोणतीही ऐतिहासिक चूक राहू नये, अशीच अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.