Dombivli : डोंबिवलीत पेटला मराठी-अमराठी वाद! सत्यनारायण, हळदी-कुंकू समारंभावरुन मराठी कुटुंबांना शिवीगाळ

Dombivli : डोंबिवली पूर्वेतील नांदीवली परिसरात मराठी आणि अमराठी रहिवाशांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ‘साई कमल छाया’ सोसायटीत येत्या २ फेब्रुवारी रोजी आयोजित सत्यनारायण पूजा आणि हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबांनी विरोध दर्शवला. या विरोधातून वाद उफाळला असून, मराठी कुटुंबांवर अपशब्द आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वादाचा सुरुवातीचा ठिणगा

सोसायटीच्या नोटिस बोर्डवर सत्यनारायण पूजेच्या आयोजनाची माहिती देण्यात आली होती. काही अमराठी सदस्यांनी याचा फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. यानंतर सोमवारी रात्री सोसायटीमध्ये दोन्ही गटांमध्ये वाद विकोपाला गेला.

मराठी कुटुंबांचा आक्षेप

मराठी कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, अमराठी रहिवाशांनी पूजेला विरोध करत शिवीगाळ केली आणि मराठी माणसांविरोधात अपमानास्पद शब्द वापरले. या प्रकरणी संबंधित मराठी कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेलमध्येही मराठी-अमराठी वाद

यापूर्वी पनवेलमधील हिरानंदानी सोसायटीतही अशा प्रकारचा वाद घडला होता. गायकवाड नावाच्या एका मराठी कुटुंबाला सोसायटीतून जबरदस्तीने बाहेर जाण्यासाठी दबाव टाकण्यात आला. घरमालकाने परवानगी दिली असतानाही सोसायटीच्या परप्रांतीय चेअरमनने दादागिरी केली. या प्रकरणात मनसेने हस्तक्षेप करून गायकवाड कुटुंबाला साथ दिली आणि चेअरमनकडून माफी मागायला लावली.

सामाजिक सलोख्याला तडा

डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंबईसह अनेक भागांमध्ये मराठी-अमराठी वाद अनेकदा चिघळले आहेत. गेल्या काही वर्षांत अशा प्रकरणांत वाढ झाल्याचे दिसून येते. डोंबिवलीतील ही घटना पुन्हा एकदा या वादाला चिघळण्यास कारणीभूत ठरली आहे.

पोलिसांची भूमिका

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मराठी आणि अमराठी गटांमधील वाद शांत करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

सामाजिक सलोखा राखण्याचा आणि दोन्ही गटांनी समजून घेत सोसायटीत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, अशी स्थानिक नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.