Fatima Sana Sheikh : बॉलिवूड अभिनेत्रीने केली दाक्षिणात्य इंडस्ट्रीची पोलखोल, सांगितला कास्टिंग काउचचा भयानक अनुभव

Fatima Sana Sheikh : ‘दंगल’ चित्रपटातून गीता फोगटची भूमिका साकारत लोकप्रिय झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक अनुभव उघड केला आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी ऑडिशन देताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा तीने खुलासा केला आहे.

कास्टिंग एजंटने विचारले ‘तुम्ही सर्वकाही करण्यास तयार आहात का?’

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत फातिमाने सांगितले की, “ऑडिशनदरम्यान एका कास्टिंग एजंटने मला थेट विचारले की, ‘तुम्ही सर्वकाही करण्यास तयार आहात का?’ त्याचा हेतू काय आहे, हे मला समजत होते, पण मी त्याला अजून पुढे बोलू द्यायचे ठरवले.”

ती पुढे म्हणाली, “दक्षिणेतील अनेक निर्माते अशा गोष्टींबाबत थेट चर्चा करतात. ते सरळ काही बोलत नाहीत, पण त्यांचा हेतू स्पष्ट असतो. ‘तुम्हाला लोकांना भेटावे लागेल’ किंवा ‘हे-ते करावे लागेल’ असे अप्रत्यक्षपणे सांगितले जात होते.”

बालकलाकार ते ‘दंगल’ची स्टार

फातिमा सना शेखने अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून प्रवेश केला होता. ‘दंगल’मधील दमदार भूमिकेनंतर तिने लुडो, अजीब दास्तान, आणि सॅम बहादूर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

तिचा आगामी चित्रपट ‘मेट्रो… इन दिनो’ हा २००७ च्या ‘लाइफ इन अ… मेट्रो’ या हिट चित्रपटाचा आध्यात्मिक सिक्वेल आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि अली फजल यांच्या भूमिका असणार आहेत.

मूळतः २९ नोव्हेंबर २०२۴ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला असून लवकरच त्याच्या नव्या प्रदर्शन तारखेची घोषणा केली जाणार आहे.