ताज्या बातम्याक्राईम

Torres scandal : टोरेस घोटाळ्यात प्रसिद्ध अभिनेत्याला अटक! मुंबईकरांना हजारो कोटींचा गंडा घालणाऱ्या कंपनीला त्यानेच…

Torres scandal : मुंबईसह देशभरातील हजारो नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोरेस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बॉलिवूडमध्ये सहायक अभिनेता म्हणून काम करणाऱ्या आर्मेन अटाइनला अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कोण आहे अभिनेता आर्मेन अटाइन?

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आर्मेन अटाइन या युक्रेनियन नागरिकाला मढ येथून अटक केली. आर्मेनने बॉलिवूड चित्रपटांसह जाहिरातींमध्ये सहायक भूमिका साकारल्या आहेत. पोलिस तपासात असे समोर आले आहे की टोरेस ब्रँड उभारण्यात आर्मेनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून, या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे.

अभिनेत्याच्या मदतीनेच सुरू झाली टोरेस कंपनी

टोरेस घोटाळ्यामागे असलेल्या युक्रेनियन आरोपींनी मुंबईत येऊन टोरेस नावाचा ब्रँड सुरू केला. मुंबईत आल्यावर त्यांनी आर्मेनशी संपर्क साधला आणि त्याच्या मदतीने कंपनी उभारण्यास सुरुवात केली. आर्मेननेच मुख्य आरोपी तौसिफ रियाजला युक्रेनियन गुन्हेगारांशी जोडले होते. तौसिफ अनेक आठवड्यांपासून फरार होता, मात्र काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासादरम्यान पोलिसांना आर्मेनच्या संलग्नतेचे पुरावे मिळाले, त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार या घोटाळ्यामुळे 3700 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना फसवण्यात आले आहे, आणि फसवणुकीचा आकडा 7 ते 8 हजार कोटी रुपयांवर जाऊ शकतो.

घोटाळ्यासाठी आयोजित झालेल्या बैठकीतही आर्मेन उपस्थित

फेब्रुवारी 2023 मध्ये साकीनाका येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये टोरेस ब्रँड उभारणीसाठी पहिली बैठक झाली. या बैठकीला आर्मेन अटाइनदेखील हजर होता. तसेच त्याने कंपनीसाठी सनदी लेखापाल शोधून देण्यास मदत केली होती. याशिवाय दादरमधील टोरेस शोरूमच्या उद्घाटनालाही तो उपस्थित होता.

कंपनी सुरू झाल्यानंतर आर्मेनने स्वतःला बाजूला घेतले, पण तो इतर आरोपींशी संपर्कात होता का? याचा तपास सुरू आहे.

बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतात वास्तव्याचा बनाव

तपासात असेही समोर आले आहे की आर्मेनने मुंबई महापालिकेचा बनावट जन्म दाखला मिळवून आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार केले होते. त्याच आधारावर त्याने मुंबईत जन्म झाल्याचा खोटा दावा करत 10 वर्षांपासून येथे राहतोय असे दाखवले. पोलिसांनी *त्याच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून, तो सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.

पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, या घोटाळ्याचे आणखी धक्कादायक तपशील उघड होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button