Maha Kumbh Mela : मोठी बातमी! महाकुंभात भयंकर चेंगराचेंगरी, १० भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Maha Kumbh Mela : महाकुंभमेळ्यात एक धक्कादायक घटना घडली असून चेंगराचेंगरीत 10 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 50 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अफवेच्या परिणामी मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे. सर्व जखमींवर महाकुंभ नगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

संगम तटावर मध्यरात्री भीषण अपघात

ही दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री संगम तटावर घडली. मौनी अमावस्या निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यात हजेरी लावली होती. दिवसभर भक्तांची गर्दी वाढत गेली आणि संध्याकाळी जमावाने बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीनंतर प्रशासनाने संगम घाटावर गर्दी रोखण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली.

रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. जमावात असलेल्या अनेक भाविकांना धक्काबुक्की झाली आणि अनेक लोक खाली कोसळले. 157 क्रमांकाच्या पिलरजवळ हा भयानक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत काही भाविकांनी प्राण गमावले होते.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींचा तातडीचा हस्तक्षेप

घटनास्थळावरून जखमी भाविकांना तातडीने सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तातडीने मदतकार्य राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मौनी अमावस्येला अमृतस्नान रद्द करण्याचा विचार

या दुर्घटनेनंतर *महाकुंभ आखाड्यांनी मौनी अमावस्येला अमृतस्नान न करण्याचा विचार सुरू केला आहे. प्रशासनासोबत *13 आखाड्यांची बैठक सुरू असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. जखमी भाविकांवरील उपचार वेगाने सुरू असून प्रशासनाने पुढील दुर्घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे.