Pune : पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी सायंकाळी भररस्त्यात एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. हल्ल्यानंतर आरोपींनी कोयते नाचवत आरडाओरड केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी चौघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, प्राथमिक तपासात हत्या व्यक्तिगत वादातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
मृत तरुणाचे नाव राहुल जाधव असून, कोथरूडच्या सागर कॉलनी परिसरात सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास हा हल्ला झाला. राहुल दुचाकीवरून जात असताना तीन ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. पालघन (कोयतासारखे धारदार शस्त्र) आणि कोयत्याने वार करत त्याचा निघृण खून करण्यात आला.
हत्या का झाली?
प्राथमिक तपासात मृत राहुल जाधवचे एका आरोपीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. हे प्रकरण कुटुंबीयांच्या कानावर गेल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात राहुलला ठार मारण्याचा कट रचला. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
ठाण्यात शिक्षिकेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका शाळेच्या संस्थाचालकावर महिला शिक्षिकेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. नोकरी कायम करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुरुवारी संस्थाचालकाला अटक करण्यात आली.
धमक्यांमुळे तक्रार करण्यास विलंब
पीडित शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, संस्थाचालकाने तिच्यावर दबाव टाकत नकार दिल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने काही काळ तक्रार केली नव्हती. मात्र, अखेर तिने पोलिसांत धाव घेतली.
मनसे कार्यकर्त्यांचा संताप
या शाळेतील महिला शिक्षकांवर सातत्याने अत्याचार आणि अपशब्द वापरण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात शाळेत धडक देत संस्थाचालकाला आणि मुख्याध्यापकाला मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता एका महिला शिक्षिकेनेही त्याच्यावर गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिकच गडद झाले आहे.
सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून, संस्थाचालकाविरोधात आणखी काही तक्रारी येतात का, याकडे लक्ष ठेवले जात आहे.