Radhika Kumaraswamy : उद्योगपतीसोबत तोडलं नातं, थेट मुख्यमंत्र्यांनाच बनवलं जीवनसाथी; १२४ कोटींच्या मालकीणीची आईवडिलांना डोकेदुखी

Radhika Kumaraswamy : बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक कलाकारांच्या प्रेमकथा मोठ्या गाजलेल्या आहेत. काही प्रेमकथा तर चित्रपटांसारख्या नाट्यमय आणि थरारक वाटतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आपण बोलणार आहोत, जिने अवघ्या १४ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली, मात्र तिचे वैयक्तिक जीवन नेहमीच चर्चेत राहिले.

लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका कुमारस्वामी आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ‘निनागागी’ या चित्रपटातून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नववीत असतानाच तिला चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आणि ‘नीला मेघा शमा’ या २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली.

प्रेम आणि वादग्रस्त पहिलं लग्न

चित्रपटसृष्टीत यश मिळवताना लहान वयातच राधिका उद्योगपती रतन कुमार यांच्या प्रेमात पडली. तिच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं, त्यामुळे दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केलं. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. २००२ मध्ये रतन कुमार यांनी राधिकाचे वडील देवराज यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली.

त्यांनी आरोप केला की, आपल्या मुलीच्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून वडिलांनी तिचे अपहरण केले. त्याचवेळी, राधिकाच्या आईने रतन कुमार यांच्यावर तिच्या मुलीला फसवून लग्नासाठी भाग पाडल्याचा आरोप केला. या सगळ्या गोंधळात, २००२ मध्ये रतन कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दुसरं लग्न आणि राजकीय वर्तुळात खळबळ

राधिकाने पुढे राजकारणातील मोठ्या व्यक्तीशी लग्न केल्याने ती पुन्हा चर्चेत आली. २००६ मध्ये तिने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी गुपचूप विवाह केला. मात्र, याबाबत तिने २०१० मध्ये खुलासा केला. कुमारस्वामी हे त्या वेळी ४७ वर्षांचे होते, तर राधिका त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान होती. त्यांचे हे दुसरे लग्न होते, कारण १९८६ मध्ये त्यांनी पहिले लग्न केले होते.

वडिलांना धक्का आणि संपत्तीचा विक्रमी आकडा

राधिकाच्या वडिलांना तिच्या या निर्णयाचा मोठा धक्का बसला. तिने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन हे लग्न केल्याने हे प्रकरण अनेक वर्षे गुप्त ठेवण्यात आले. मात्र, सत्य समोर आल्यानंतर मोठी खळबळ माजली.

चित्रपटसृष्टीत फारसा प्रभाव पडू न शकलेल्या राधिकाने व्यावसायिक क्षेत्रात मात्र मोठी झेप घेतली आहे. तिच्या नावावर जवळपास १२४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती आहे, तर तिचे पती कुमारस्वामी यांच्याकडे ४४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सध्या दोघेही एकत्र असून त्यांना एक मुलगी आहे.

राधिकाचा हा प्रवास अत्यंत नाट्यमय असून, तिच्या आयुष्यातील घडामोडी आजही चर्चेचा विषय ठरतात.