Bandra Terminus : मुंबईत धक्कादायक घटना! वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्…

Bandra Terminus : मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वे पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपी हमालाला अटक केली असून, त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय घडले नेमके ?

शनिवारी, 1 फेब्रुवारी रोजी रात्री हरिद्वारहून ५५ वर्षीय महिला आपल्या नातेवाईकासोबत वांद्रे टर्मिनसवर पोहोचली. काही वेळानंतर नातेवाईक काही कामासाठी बाहेर गेले, तर ही महिला प्लॅटफॉर्मवरच थांबली. झोप अनावर होत असल्याने तिने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन विश्रांती घेतली.

याच दरम्यान, स्थानकात काम करणाऱ्या एका हमालाने तिला एकटी पाहिले आणि संधी साधत ट्रेनमध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार केला. गुन्हा करून आरोपी तिथून पळून गेला.

महिलेच्या नातेवाईकांनी परत आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार सांगितला, आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक

तक्रार मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

ही घटना घडल्यानंतर स्थानकावरील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सुरक्षा कर्मचारी असतात, मग या घटनेच्या वेळी गस्त का नव्हती? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्लॅटफॉर्म प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईला महिला सुरक्षेसाठी सुरक्षित शहर मानले जाते, मात्र गेल्या काही महिन्यांतील घटना वेगळेच चित्र दाखवत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. आता वांद्रे स्थानकातील या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

पोलिसांकडून रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र अशा घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.