Ayodhya : दलित तरुणीची निर्घृण हत्या, डोळे काढलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला अन् खासदार ढसाढसा रडू लागला

Ayodhya : उत्तरप्रदेशातील अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पत्रकार परिषदेत भावुक झाले. एका दलित तरुणीच्या निर्घृण हत्येने ते व्यथित झाले आणि बोलताना अश्रू अनावर झाले. विशेष म्हणजे, या प्रकरणात न्याय न मिळाल्यास ते खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

काय आहे प्रकरण?

अयोध्येतील सहानवा गावात एका तरुणीचा मृतदेह एका कॅनलमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळून आला. या हृदयद्रावक घटनेत पीडितेचे हात-पाय दोरीने बांधलेले होते, शरीरावर खोल जखमा होत्या आणि तिचे डोळे काढण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, ३० जानेवारीपासून ती बेपत्ता होती आणि तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. अखेर, ती गावापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर मृतावस्थेत सापडली.

खासदारांचा संताप आणि भावनिक प्रतिक्रिया

या अमानुष घटनेबद्दल अवधेश प्रसाद यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, प्रशासन मुलीला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते रडू लागले. त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते “मला लोकसभेत जाऊ द्या, मी हे प्रकरण पंतप्रधान मोदींसमोर मांडणार आहे. जर न्याय मिळाला नाही तर मी खासदारकीचा राजीनामा देईन!” असे स्पष्टपणे सांगत आहेत.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उपस्थित आहे. प्राथमिक तपासात तरुणीची हत्या इतरत्र करून मृतदेह कॅनलमध्ये टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली जात आहे. आता सरकार आणि प्रशासन यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.