Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारावरून दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला आणि मोठ्या भावाने मृतदेहाचा अर्धा हिस्सा मागितल्याने गावात खळबळ उडाली.
अंत्यसंस्कारावरून वाद
टीकमगडच्या लिधोराताल गावात राहणारे ८४ वर्षीय ध्यानी सिंह घोष यांचे रविवारी दीर्घ आजारानंतर निधन झाले. वृद्धापकाळात ते धाकट्या मुलगा देशराजसोबत राहत होते आणि त्यानेच त्यांची देखभाल केली होती. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मोठा मुलगा किशन गावात पोहोचला आणि अंत्यसंस्कार स्वतः करण्याचा आग्रह धरला. मात्र, वडिलांची इच्छा धाकट्या मुलाने अंत्यसंस्कार करावेत, असे देशराजने सांगितल्याने वाद उफाळून आला.
विचित्र मागणीमुळे ग्रामस्थ चकित
वाद विकोपाला गेल्यावर दारूच्या नशेत असलेल्या किशनने वडिलांच्या मृतदेहाचे *अर्धे-अर्धे तुकडे करून दोघांनी अंत्यसंस्कार करावेत, अशी धक्कादायक मागणी केली. हा प्रकार पाहून **गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी किशनला समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर, तो रागाच्या भरात तिथून निघून गेला आणि *धाकट्या भावाने वडिलांचे अंत्यसंस्कार केले.
गावकऱ्यांमध्ये संताप आणि आश्चर्य
या विचित्र मागणीमुळे गावकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त करण्यात आला. कोणताही मुलगा आपल्या वडिलांच्या मृतदेहावर अशी मागणी कशी करू शकतो? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. ही घटना गावभर चर्चेचा विषय बनली आहे.