Dhananjay Munde : वांद्रे कोर्टाने करुणा शर्मा यांना दिलासा दिला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी द्यावी, असा निर्णय दिल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर येऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. करुणा शर्मा यांनी असेही आरोप केले आहेत की, जेव्हा त्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या, तेव्हा तेथे धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते, पण तरीही वाल्मिक कराड सारख्या गुंडांनी त्यांना मारहाण केली.
करुणा शर्मा यांच्या या आरोपांनंतर, त्यांचा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने प्रतिक्रिया दिली आहे. सिशिव मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी म्हटले आहे, “मी सिशिव धनंजय मुंडे आहे. मला माध्यमांसोबत बोलणं आता महत्त्वाचं वाटत आहे, कारण माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचं माध्यम बनवण्यात आलं आहे. माझे वडील सर्वोत्कृष्ट नाहीत, पण ते माझ्या आईसारखे आम्हाला हानिकारकही नाहीत.”
सिशिव मुंडे यांनी असेही म्हटले आहे की, “माझी आई करुणा मुंडे वडील धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना तसा त्रास झालेला नाही. याउलट, मी, माझी बहीण आणि वडील धनंजय मुंडे यांना आईकडून त्रास झाला आहे.
आमची आई ट्रॉम्याचा सामना करताना आम्हालाच वाईट पद्धतीने त्रास द्यायची. तिने आमचा छळ केला आहे. तिने माझ्या वडिलांना मारहाण केली, त्यामुळे वडील घरातून निघून गेले. 2020 पासून माझे वडीलच माझी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही, ती फक्त वडिलांचा सूड घेण्यासाठी बनाव रचत आहे.”
सिशिव मुंडे यांनी असेही स्पष्ट केले आहे की, “माझे वडील सर्वोत्कृष्ट नसले तरी ते आम्हा भावंडांसाठी कधीही हानिकारक नव्हते. याउलट, आईने जाणीवपूर्वक घराचे हफ्ते भरले नाहीत, त्यामुळे आम्हाला आर्थिक विवंचना आहे, असे त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रत्यक्षात आम्ही आर्थिक विवंचनेत नाही.”