Karuna Sharma : राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने फटका दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा शर्मांनी प्रत्यक्षात १५ लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने २ लाख रुपये मंजूर केले.
याशिवाय, करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘निवडणुकीच्या काळात मला बीड सोडण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. धनंजय मुंडेंच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या वाल्मिक कराडने मला बेदम मारहाण केली होती,’ असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड सध्या सरपंच हत्या प्रकरणात तुरुंगात आहे.
करुणा शर्मा यांनी पुढे सांगितले की, मुंबईत राहत असताना पोलिस वारंवार येऊन त्यांना अडवायचे, त्यामुळे त्या बीडमध्ये राहायला आल्या. मात्र, बीड सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. ‘मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना धनंजय मुंडे तेथे उपस्थित असल्याची कल्पना मला नव्हती. तिथेच वाल्मिक कराडने मला जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये नेऊन मारहाण केली. त्यावेळी धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकारी दीप मुधोळ मुंडे उपस्थित होते, पण कोणीही त्याला रोखले नाही,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.
याबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळावे यासाठी त्यांनी पोलिस महासंचालक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. मात्र, अद्याप ते फुटेज त्यांना मिळाले नाही.
महिला आयोगाकडे तक्रार केली का, या प्रश्नावर करुणा शर्मा म्हणाल्या, ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या फक्त नेत्यांसाठीच काम करतात. त्यांच्याकडे तक्रार करून काही उपयोग नाही. मी राष्ट्रीय महिला आयोगाला निवेदन दिले असून, चाकणकरांना हटवण्याची मागणी केली आहे. कारण त्या धनंजय मुंडेंची बाजू घेतात. त्यांच्या सोबतचे फोटोही उपलब्ध आहेत.’
या संपूर्ण प्रकरणावर धनंजय मुंडे आणि प्रशासनाकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.