Sujay Vikhe : राज्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधनावर हल्ल्यांसोबतच, बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढला असून अनेक निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर “नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी” या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत.
“बिबट्या माणसांना मारू शकतो, पण त्याला मारण्याची परवानगी नाही,” असे म्हणत त्यांनी वनविभागाकडून सविस्तर माहिती घेत असल्याचे सांगितले. वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्यांचा उच्छाद
माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, “संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. वनविभागाकडून याची सर्व माहिती घेतली असून, यावर अभ्यासही पूर्ण होत आला आहे. लवकरच जनहित याचिका दाखल करून न्यायालयात या मुद्द्यावर लढा देणार आहे.”
शिर्डी संस्थानच्या निर्णयाचे स्वागत
शिर्डी संस्थानने मोफत अन्नछत्रासाठी कुपन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भक्तांनाच हे कुपन दिले जाणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील म्हणाले, “संस्थानचा हा निर्णय योग्य आहे. यामुळे भक्तांसाठी सुविधा अधिक नियोजनबद्ध होतील. तसेच, शिर्डीत वेगवेगळ्या कारणांनी स्थायिक झालेल्या लोकांची संख्याही यामुळे स्पष्ट होईल.”
संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेत बदल करण्यात आला असून, “आगामी काळात कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याची शक्यता आहे,” असेही त्यांनी सांगितले.
शिर्डीतील पोलिस कारवाईवर प्रतिक्रिया – “देर से आये, पण दुरुस्त आये!”
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. गुरुवारी 100 हून अधिक जणांची धरपकड करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील म्हणाले, “पोलिसांनी उशिरा का होईना, पण योग्य कारवाई सुरू केली आहे. नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती झाली असून, लवकरच नवीन वाहनेही मिळणार आहेत. त्यामुळे शहरात सुधारणा होईल.”
“आठवडाभरात अतिक्रमणमुक्त आणि सुव्यवस्थित शिर्डी दिसेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंदिरासमोर महामार्गावर मोठ्या आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. “यामुळे काहींचे आर्थिक नुकसान होईल, पण समाजहित महत्त्वाचे असल्याने योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.