Sindhudurg : “ये कपातली माशी काढ…” पुण्याच्या पर्यटकाने विनंती करताच कोकणातील हॉटेल मालकाने केले हादरवणारे कृत्य

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. चहात माशी पडल्याच्या किरकोळ कारणावरून पुण्याच्या पाच ते सहा पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी झिरो पॉईंट परिसरात घडली. या प्रकरणी सहा जणांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा क्रम असा की, रुपेश बबन सपकाळ (वय ३३, राहणार-कात्रज, पुणे) हे त्यांच्या मित्रांसह गोव्याला जात असताना झाराप येथे झिरो पॉईंटवर चहा पिण्यासाठी थांबले. तेव्हा त्यांना चहाच्या कपात माशी पडलेली दिसली. त्यांनी ही बाब हॉटेल मालक तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनाला आणली आणि चहा बदलून देण्यास सांगितले.

तथापि, चहा बदलून न मिळाल्यावर रुपेश सपकाळ यांनी चहाचे पैसे देणार नसल्याचे सांगितले. यावर तनवीर शेख रागावून त्याने आपल्या साथीदारांसह रुपेश सपकाळ आणि त्यांच्या मित्र संजय सुदाम चव्हाण (राहणार-पुणे) यांना दोरीने बांधून काठी आणि हाताच्या ठोशांनी बेदम मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून त्यांना बांधून ठेवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पर्यटकांनी ११२ नंबरवरून पोलिसांना कळवले. कुडाळ पोलिस ठाण्यातील पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि रुपेश सपकाळ यांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत सापडले. त्यांना कुडाळ येथे आणण्यात आले. या घटनेबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई योगेश मुंढे यांनी तक्रार नोंदवली.

त्यानुसार, तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय ५७), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय १८), परवीन शराफत शेख (वय ४२), साजमीन शराफत शेख (वय १९) आणि तलाह करामत शेख (वय २६) या सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी झाराप खान मोहल्ला, कुडाळ येथील आहेत.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कहऱ्हाडकर अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.