Raj Thackeray : ‘राज ठाकरेंना मुलालाही निवडून आणता आलं नाही’ अजितदादांच्या टिकेवर अमित ठाकरेंची ‘भारी’ प्रतिक्रिया

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका करताना, “राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, आणि गप्पा मारतात,” असे विधान केले होते. त्यावर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“हरलो, पण खचलो नाही” – अमित ठाकरे

मुंबईत पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “मी अजून खूप लहान आहे, माझ्या वडिलांनीच (राज ठाकरे) त्यांना उत्तर द्यावं. मात्र, एवढंच सांगतो की, मी या निवडणुकीत हरलो असलो तरी खचलो नाही. निवडणुकीच्या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळालं. मी माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही, तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करा.”

ते पुढे म्हणाले, “मनसे हा जमिनीवर काम करणारा पक्ष आहे. कुठल्याही प्रकरणात जर काही अडचण आली, तर ती राजसाहेबांपर्यंत पोहोचते आणि मग तो प्रश्न मार्गी लागतो. प्रत्येक पक्षाला यश मिळवायचं असतं, आमच्याही वाट्याला ते येईल आणि आम्हीही भविष्यात सत्तेत बसू.”

“बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात”

अमित ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवरही भाष्य करत, “राजसाहेब नेहमीपासूनच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. विधानसभा निवडणुकीत जे झालं ते अनपेक्षित होतं,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची तुलना क्रिकेटपटूंसोबत करत, “राज ठाकरे हे राजकारणातील विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. एवढंच नव्हे, तर सचिन तेंडुलकर यांच्यासारखे कोणता चेंडू कसा खेळायचा, हे त्यांना अचूक माहिती आहे. मीही त्यांच्याकडून शिकतो आहे,” असे ते म्हणाले.

अमित ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव

राज ठाकरे यांनी आपल्या मुलाला मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, अमित ठाकरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी विजय मिळवला, तर शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि अमित ठाकरे पराभूत झाले.

या पराभवानंतर मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात असला, तरी अमित ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.