stock market : भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांचा कल हळूहळू कमी होत आहे, तर चीनमध्ये परदेशी गुंतवणूकदारांची आवक वाढत आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत FPI (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) ने तब्बल १ लाख कोटी रुपयांचे स्टॉक्स विकले असून, ही विक्री अद्यापही सुरूच आहे.
रुपयाची घसरण, अमेरिकन बाँडवरील वाढता परतावा आणि भारतीय कंपन्यांचे कमकुवत निकाल या घटकांमुळे गुंतवणूकदार भारतातून पैसे काढत आहेत. जर ही स्थिती कायम राहिली, तर शेअर बाजाराला सावरणे कठीण होईल आणि गुंतवणूकदारांचे नुकसान अधिक वाढण्याची शक्यता आहे.
भारतातून विदेशी गुंतवणूकदारांचा माघार
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) सातत्याने भारतीय शेअर बाजारातून पैसे बाहेर काढत आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत त्यांनी जवळपास १ लाख कोटी रुपयांची विक्री केली आहे. विशेषतः ‘डेडिकेटेड फंड्स’द्वारे भारतीय शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले गेले आहेत. याउलट, चीनमध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत चालला आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता
एलारा सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांपासून भारतातून गुंतवणूक कमी होत असून, गेल्या आठवड्यात तब्बल ४०५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम काढण्यात आली. यातील २३८ दशलक्ष डॉलर्स हे ‘डेडिकेटेड फंड्स’मधून काढले गेले. ऑक्टोबर २०२४ नंतर प्रथमच अमेरिकन निधीतून भारतात गुंतवणूक थांबली आहे.
त्याचबरोबर आयर्लंडमधून १०३ दशलक्ष डॉलर्स, लक्झेंबर्गमधून ८८ दशलक्ष डॉलर्स आणि जपानमधून ४६ दशलक्ष डॉलर्स बाहेर काढण्यात आले आहेत. अमेरिकेतून भारतात येणारी गुंतवणूक प्रामुख्याने ETF द्वारे होत असते, तर इतर देशांतून येणारी गुंतवणूक मुख्यतः सक्रिय निधीमध्ये असते.
चीनमध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला
गेल्या दोन आठवड्यांपासून चीनमध्ये परकीय गुंतवणूक वाढत आहे. गेल्या आठवड्यात एकूण ५७३ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक चीनमध्ये झाली, जी ऑक्टोबर २०२४ नंतरची सर्वाधिक आहे. ब्रोकरेज संस्थांच्या मते, जागतिक निधी व्यवस्थापकांनी भारताऐवजी चीनमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सतत घसरत असल्यामुळे FPI ची विक्री वाढली आहे.
भारतीय बाजारावर परिणाम
अमेरिकेतील दहा-वर्षीय बाँडवरील परतावा वाढला असून, रुपया कमकुवत होत आहे. परिणामी, भारतीय शेअर बाजारातून मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी आकर्षक ठरत आहे. त्यातच भारतीय कंपन्यांचे सलग दुसऱ्या तिमाहीतील कमकुवत निकालही गुंतवणुकीवर परिणाम करत आहेत. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार भारताकडून पाठ फिरवून चीनकडे वळत आहेत.