Hadapsar : पुण्यातील फ्लॅटमधून रात्री-अपरात्री येत होते ओरडण्याचे आवाज, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले…

Hadapsar : पुण्याच्या हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने 350 मांजऱ्या पाळल्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या महिलेने 3BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजऱ्या ठेवल्याने दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
या समस्यांमुळे सोसायटीतील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार केली असली तरी, त्यांच्या तक्रारीकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नसल्याचे ते सांगत आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मांजरांच्या उग्र वासामुळे, ड्रेनेजमधून वाहणाऱ्या दूषित पाण्यामुळे आणि त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे सतत त्रास होत आहे.
सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी मांजरांचा आवाज आणि घाण वास यामुळे संपूर्ण परिसर प्रभावित झाला आहे. रहिवाशांच्या मते, या समस्येमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा व्यत्यय आला आहे. या समस्येबाबत रहिवाशांनी 2020 मध्ये पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
त्यावेळी संबंधित महिलेकडे 50 मांजऱ्या असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत मांजऱ्यांची संख्या वाढत वाढत 350 पर्यंत पोहोचली आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिकेने महिलेवर कारवाई करण्यासाठी नोटीस काढली आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या मांजऱ्यांमुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही धोका निर्माण झाला आहे. त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, या मांजऱ्यांमुळे विविध आजार पसरू शकतात, त्यामुळे या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन योग्य कारवाई करावी. गेल्या पाच वर्षांपासून ही समस्या प्रलंबित असून, प्रशासनाने यावर पुरेसे लक्ष दिलेले नाही, अशी रहिवाशांची तक्रार आहे.
या विचित्र घटनेमुळे पुणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे. आता महानगरपालिका या समस्येवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.