Suresh Dhasa : सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली चुकीची माहिती? मुंडेंच्या भेटीमागचं खरं कारणही सांगितलं
Suresh Dhasa : भाजप आमदार सुरेश धस यांनी आज महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी मोठा खुलासा केला.
“धनंजय मुंडेंशी फक्त 20 मिनिटांचीच भेट झाली”
सुरेश धस म्हणाले, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी 30 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यासोबत माझी भेट झाली होती. ही भेट केवळ 20 मिनिटांची होती. मी लगेच तिथून निघून गेलो. मात्र, बावनकुळे यांनी 4 तास बैठक झाल्याचे चुकीचे वक्तव्य केले. ते तसे का बोलले, हे त्यांनाच विचारा.”
“मी भेटायला गेलो होतो, पण गुप्त बैठक नव्हती”
धस यांनी स्पष्ट केले की, “धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीस गैरहजर का होते, याची मला कल्पना नाही. मात्र, मी त्यांना केवळ आजारी असल्याने माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो. तसेच, बावनकुळे यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते, म्हणून मी गेलो होतो. ही भेट रात्री 9:30 वाजता झाली. अशा वेळी कोणतीही ‘गुप्त बैठक’ होऊ शकत नाही.”
“साडेचार तासांचा शब्द संभ्रम निर्माण करणारा”
धस यांनी पुढे सांगितले, “मी फक्त 30 मिनिटांत बाहेर पडलो होतो. मात्र, बावनकुळे यांनी ‘साडेचार तास बैठक झाली’ हा शब्द कसा आणि का वापरला, हे मला माहिती नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. याबाबत विचारायचे असेल, तर तुम्ही थेट बावनकुळे यांनाच विचारा.”
“माझी बदनामी करणाऱ्यांचा पर्दाफाश करणार”
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत सांगितले, “बीड जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचे आणि काही लोकांचे हे सुनियोजित षडयंत्र आहे. दोन वेगवेगळ्या घटनांची सांगड घालून मला गोवलं जात आहे. मी याची शंभर टक्के तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असून, लवकरच या बदनामीचा पर्दाफाश करणार आहे.”
भाजपच्या अंतर्गत वादाची चर्चा सुरू
या प्रकरणामुळे भाजपच्या अंतर्गत वादांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची यावर काय प्रतिक्रिया असेल आणि मुख्यमंत्र्यांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.