ताज्या बातम्याराजकारण

Suresh Dhas : कळंबमध्ये बाई तयार होती, पण…; सरपंच देशमुखांना बदनाम करण्याचा डाव काय होता? सुरेश धसांनी सगळंच सांगीतलं..

Suresh Dhas : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे भासवण्याचा कट रचला गेला होता, असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. हा कट अंमलात आणण्यासाठी कळंब येथे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते, मात्र संतोष देशमुख यांचा जीव आधीच गेल्याने हा डाव फसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धस यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील अवैध राख वाहतूक व आर्थिक गैरव्यवहारांमध्ये सहभागी वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत तपासणी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

बीड पोलिसांवर गंभीर आरोप

आमदार धस यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे आरोप केले आहेत. त्यांनी विशेषतः पोलिस अधिकारी गणेश मुंडे याच्या नियुक्तीबाबत संशय व्यक्त करत, त्याच्यावर सुरू असलेल्या एसीबी चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्याला महत्त्वाच्या पदावर कसे नियुक्त करण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी केली.

देशमुखांच्या हत्येनंतर बदनामीचा डाव

आमदार सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार, संतोष देशमुख यांना कळंब येथे नेऊन एका महिलेच्या माध्यमातून त्यांच्यावर अनैतिक संबंधाचा आळ आणण्याचा कट रचला गेला होता. काहीशी झटापट घडल्याचा बनाव करून, त्यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असे भासवण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र, त्यांचा मृत्यू आधीच झाल्याने हा डाव अयशस्वी ठरला.

“माझ्यावर संशय घेण्याची गरज नाही” – सुरेश धस

या प्रकरणात धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने स्वतःवर होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ३० दिवसांपूर्वी मी भेटलो होतो. ती चर्चा २०-३० मिनिटांची होती. मात्र, बावनकुळे बोलण्याच्या ओघात साडेचार तास चर्चा झाल्याचे म्हणाले. ते तसे का म्हणाले हे त्यांनाच विचारावे.”

“बदनामी करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार”

आपली जाणून-बुजून बदनामी केली जात असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस म्हणाले, “बीड जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने माझी बदनामी केली आहे. मी याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.”

“मस्साजोगची लढाई शेवटपर्यंत लढणार”

आमदार धस यांनी स्पष्ट केले की, “मस्साजोग गावच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. या प्रकरणात मी काही चुकीचे केले नाही. त्यामुळे मी ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहे.”

Related Articles

Back to top button