Brazil : फुलपाखराला चिरडलं, अवशेष इंजेक्शननं शरीरात सोडले; पोराची तब्येत बिघडली, ७ दिवसांनंतर…
Brazil : ब्राझीलच्या बाहियामध्ये एका १४ वर्षीय मुलाचा सोशल मीडिया ट्रेंडच्या आहारी जाऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डेव्ही नन्स मोरेइरी या तरुणाने एका ऑनलाईन चॅलेंज अंतर्गत फुलपाखरू मारून त्याचे अवशेष इंजेक्शनच्या माध्यमातून स्वतःच्या शरीरात सोडले. काही तासांतच त्याची प्रकृती बिघडू लागली, आणि सात दिवसांच्या उपचारांनंतर त्याचा मृत्यू झाला.
डेव्हीने हा प्रयोग का केला, याचा तपास बाहिया पोलीस करत आहेत. काही स्थानिक माध्यमांनुसार, तो एका प्रयोगाची नक्कल करत होता, मात्र मृत्यूपूर्वी त्याने ही बाब नाकारली. डेव्हीने एका मेडिकल स्टोअरमधून इंजेक्शन खरेदी केले आणि एका मृत फुलपाखरूला पाण्यात मिसळले.
त्यानंतर तयार झालेले मिश्रण त्याने उजव्या पायात टोचले. काही वेळातच त्याला उलट्या सुरू झाल्या, चालण्यात तोल जाऊ लागला आणि प्रकृती गंभीर बिघडली. कुटुंबाला सुरुवातीला त्याला नेमके काय झाले हे कळले नाही. मात्र, नंतर डेव्हीने डॉक्टरांना संपूर्ण प्रकार सांगितला.
मृत्यूचे संभाव्य कारण
विटोरिया दा कॉन्क्विस्टा जनरल रुग्णालयात आठवडाभर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, डेव्हीचा मृत्यू एम्बोलिझम, संसर्ग किंवा एलर्जीमुळे झाला असण्याची शक्यता आहे. इंजेक्शनमध्ये हवा राहिल्यामुळे रक्तवाहिनीत गाठ (एम्बोलिझम) निर्माण झाली असावी, असेही डॉक्टरांनी नमूद केले.
ही घटना सोशल मीडिया ट्रेंडचे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात, याचे एक जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे पालक आणि तरुणांनी या प्रकारच्या अनोळखी आणि धोकादायक प्रयोगांपासून सावध राहणे आवश्यक आहे.फुलपाखराला चिरडले, अवशेष इंजेक्शननं शरीरात सोडले; मुलाची प्रकृती खालावली, ७ दिवसांनंतर…