Amit Shah : “माझ्या तर अंगावर काटा आला”; फडणवीसांचा उल्लेख करत महाराष्ट्राबद्दल अमित शहा यांचे वक्तव्य
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी पुण्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिली आर्थिक मदत वाटप केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच देशात एकाच वेळी 20 लाख लोकांना स्वतःचे घर मिळत आहे. शाह यांनी सांगितले की, “20 लाख लोकांना एकाच वेळी घर देण्याचा हा कार्यक्रम ऐकून जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले.”
“20 लाख लोकांचे स्वप्न पूर्ण झाले”
अमित शाह म्हणाले, “आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून 20 लाख लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. काही दिवसांपूर्वी मी उत्तर प्रदेशातील देवरिया गावात होतो. तेथे एका आईला घर मिळाले आणि तिने सांगितले की, ‘माझ्या सातव्या पिढीला स्वतःचे घर मिळाले, माझे जीवन धन्य झाले.’ आज 20 लाख लोकांना स्वतःचे घर मिळत आहे. यासोबतच सोलर पॅनल, शौचालय आणि लवकरच गॅस सिलेंडरदेखील मिळणार आहे. हे सर्व एकत्र पूर्ण करण्याचे काम मोदी सरकार आणि महायुती सरकार करत आहे.”
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“महाराष्ट्राला सर्वाधिक घरे मंजूर”
अमित शाह यांनी सांगितले की, 2047 पर्यंत भारताने विकसित देश होण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी घर आणि मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-2 सुरू केली असून, त्याअंतर्गत सर्वाधिक घरे महाराष्ट्राला मंजूर झाली आहेत. “घर मिळणे म्हणजे विकासाच्या दिशेने पहिले पाऊल उचलणे आणि पुढील पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य घडवणे,” असेही ते म्हणाले.
“असली शिवसेना आणि राष्ट्रवादी कोण, हे महाराष्ट्राने ठरवलं”
शाह म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळवून दिले आणि हे स्पष्ट केले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोण आहे.” जून 2022 आणि जुलै 2023 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. एक गट महायुतीमध्ये गेला, तर दुसरा महाविकास आघाडीसोबत राहिला. नोव्हेंबरमधील निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
अमित शाह म्हणाले, “तुमच्या आशीर्वादाने महायुती सत्तेत आली आणि भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन झाले. महाराष्ट्राच्या जनतेने ऐतिहासिक जनादेश देऊन स्पष्ट केले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोण आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना शाह यांनी सांगितले की, भाजप सरकारने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना-2 सुरू केली. 2029 पर्यंत या योजनेंतर्गत पाच कोटी घरे बांधली जातील, यापैकी 3.80 कोटी घरांचे वाटप आधीच झाले आहे.