ताज्या बातम्याराजकारण

Suresh Dhas : ‘जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी..’, सुरेश धसांची मोठी घोषणा

Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याने राज्यभर खळबळ माजली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून, विविध नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.

सत्कार नाकारत न्यायासाठी भूमिका ठाम
आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केलं की, जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण कोणताही सत्कार स्वीकारणार नाही. धाराशिवमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार होणार होता, मात्र त्यांनी तो नाकारला. या कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.

परळी दौऱ्यात विरोधाचा सामना
शनिवारी सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची व ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांनी ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असला तरी परळी दौऱ्यात त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. काही नागरिकांनी आरोप केला की, धस परळीचं नाव बदनाम करत आहेत. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

धनंजय मुंडे यांची भेट चर्चेचा विषय
काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धस यांच्यावर टीका केली. मात्र, धस यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की, त्यांनी ही भेट केवळ मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी घेतली होती.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार योग्य कारवाई करत नाही, असा आरोप करत धस यांनी हा मुद्दा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Back to top button