Neelam Gore : एक बाई काय बोलली, तुम्ही तुटून पडता? आम्ही खोलात गेलो तर… संजय शिरसाटांचा ठाकरेंना इशारा
Neelam Gore : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे. “शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की पद मिळते,” असे विधान करत त्यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या या वक्तव्यावरून उबाठा गट आक्रमक झाला असून, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय राऊत आक्रमक – नीलम गोरे यांना डिवचले
नीलम गोरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना “त्या बाई आहेत का? त्या बाई माणूस आहेत,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर करत गोरे यांच्या विरोधात काही पुरावे असल्याचा दावा केला. सुषमा अंधारे यांनीही गोरे यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संजय शिरसाटांचे प्रत्युत्तर – मोठा इशारा उबाठा गटाला
संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर थेट आरोप करत मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “मागील निवडणुकीत पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या शिवसैनिकांना डावलून आठ-दहा दिवस पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांना तिकिटे दिली. हे तिकिट पैशांच्या देवाणघेवाणीवर वाटले गेले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“तिकिटांसाठी पैसे घेतले गेले” – शिरसाटांचा दावा
शिरसाट पुढे म्हणाले की, “मराठवाड्यात अनेक ठिकाणी पैसे घेऊन तिकिटे वाटली गेली. त्यामुळे प्रामाणिक शिवसैनिक बाजूला पडले. मात्र, आता दलाल उभे राहून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर बोलाल तर आम्हीही उघड बोलू, त्यावेळी कोण, कुठे आणि किती पैसे घेतले, हे सगळ्यांना समजेल.”
“पूर्वी बाळासाहेब विचारायचे, आता तिकिटासाठी पैसे मोजायला लावतात”
शिरसाट यांनी शिवसेनेतील बदलांवरही भाष्य करत सांगितले की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांना विचारायचे – बाळा, तुझ्याकडे पैसे आहेत का? तुला काही मदत लागेल का? पण आता तिकिटासाठी पक्षाला किती पैसे देतोस, असे विचारले जाते.”
महिला नेत्यांवर हल्ला? – शिरसाटांचा राऊतांना सवाल
संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांना काही महिला पाठवल्याचा आरोप करत शिरसाट म्हणाले, “एखादी महिला बोलली, तर तुम्ही तिच्या अंगावर तुटून पडता? तुम्ही स्वतःला मर्द समजता? आम्ही जास्त खोलात गेलो तर तुम्हाला अडचण होईल.”
या वादामुळे शिवसेनेच्या गटांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.