Shripal Sabnis : गोडसे नीच आणि नालायक ब्राम्हण, चातुर्वण्याच्या मुळाशी ब्राम्हण, मी माझ्या पुर्वजांच्या चुकांची माफी मागतो – सबनीस
Shripal Sabnis : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ब्राह्मण समाज आणि हिंदुत्ववाद्यांवर केलेल्या विधानामुळे राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्याने महात्मा गांधींची हत्या केली,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात डॉ. विलास तायडे लिखित ‘वाड्:मय विलास गौरवग्रंथ’ आणि ‘बैलबंडी ते हवाई दिंडी’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण आहेत, आणि यालाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीव्र विरोध केला.”
“धर्माची मग्रुरी देशासाठी घातक”
डॉ. सबनीस यांनी हिंदुत्ववाद्यांवरही टीका करत म्हटले की, “नथुराम गोडसेचे पुतळे उभारले जात आहेत. हे धर्मकारण नाही, तर धर्माची मग्रुरी आहे. अशा प्रवृत्तींमुळे देश धोक्यात येऊ शकतो.”
“मतदार विकाऊ, लोकशाही धोक्यात”
त्यांनी देशातील राजकीय स्थितीवरही जोरदार हल्लाबोल केला. “आज मतदार, मंत्री, आमदार आणि सरपंच विकले जात आहेत. पाच कोटींना एक आमदार विकत घेतला जातो. जनता स्वतःच दोन हजारांच्या नोटेसाठी आपले मत विकत आहे. ज्या देशातील लोकशाही विकायला निघाली आहे, त्या देशाचे भवितव्य काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, विद्रोही साहित्य संमेलनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई व्हावी आणि निष्पक्ष चौकशीसाठी मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठरावात मागणी करण्यात आली.
डॉ. सबनीस यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.