Narendra Modi : ‘तुम्ही कडक भूमिका घेऊन पावलं उचला,’ पंतप्रधान मोदींचे फडणवीसांना थेट आदेश, दिला फ्री हॅण्ड
Narendra Modi : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. मसाजोग प्रकरणावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून, दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचारविरोधी कारवाईसाठी मोकळे हात दिल्याची माहिती आहे.
दिल्ली येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. मोदींनी स्पष्ट निर्देश दिले की, राज्यातील प्रशासन पारदर्शक व शिस्तबद्ध असले पाहिजे. तसेच भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश त्यांनी फडणवीसांना दिले आहेत.
- प्रशासनात पारदर्शकता आणि प्रामाणिकता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
- राज्यकारभार स्वच्छ व नियमबद्ध असला पाहिजे.
- भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन निर्णय घ्यावेत.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टोलवण्यात आला होता. मात्र, आता पंतप्रधान मोदींनीच कारवाईसाठी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. मसाजोग प्रकरणात अडकलेल्या मुंडेंच्या भवितव्याबाबत लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही न्यायालयाने कागदपत्र फेरफार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने जामीन मिळाला असला, तरी त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आले आहे. त्यामुळे कोकाटेंबाबतही मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.