ताज्या बातम्या

Mahashivratri : भक्तीमय वातावरणाला हिंसेचे गालबोट, घृष्णेश्वर मंदिरात तुफान हाणामारी, व्हिडिओ आला समोर

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशात शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. काशी विश्वनाथ, प्रयागराज, अयोध्या, नाशिक, देवघर आणि उज्जैनसह देशभरातील शिवमंदिरांमध्ये “बम-बम भोले”च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिर परिसर गजबजला आहे. मात्र, या भक्तिमय वातावरणात एका वादातून दोन भाविकांमध्ये हाणामारी झाली. विशेष म्हणजे, ही हाणामारी फ्रीस्टाइल मारामारीसारखी वाटली, त्यामुळे हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला प्रारंभ

दरम्यान, दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय पूजेचा शुभारंभ करण्यात आला.

औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे आहे, तेथेही महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. मंदिर परिसर ‘बम बम भोले’ आणि ‘श्री नागनाथ महाराज की जय’ च्या जयघोषाने गजबजून गेला. काही भक्तांनी अनवाणी चालत मंदिरात प्रवेश करून श्रद्धा व्यक्त केली.

हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी विकास माने, आणि आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक प्रभू नागनाथाच्या मूर्तीचे मध्यरात्री दुग्धाभिषेक आणि महापूजन केले. पूजा पूर्ण झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे रात्री दोन वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले.

संपूर्ण देशात भक्तीमय वातावरण

महाशिवरात्री हा भगवान शंकर आणि पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस मानला जातो. तसेच, या दिवशीच शिवशक्तीचा संयोग आणि विश्वाच्या निर्मितीला आरंभ झाल्याचे मानले जाते. त्यामुळे देशभरातील शिवमंदिरांमध्ये मोठ्या श्रद्धेने महाशिवरात्री साजरी केली जात आहे.

Related Articles

Back to top button