Kerala : केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. २३ वर्षीय अफान नावाच्या तरुणाने आपल्या कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर त्याने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे आणि कौटुंबिक तणावामुळे त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हत्या करण्याची पद्धत आणि तपशील
सोमवारी काही तासांच्या अंतरात अफानने तीन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कुटुंबातील सदस्यांची क्रूरपणे हत्या केली.
पहिली हत्या: सकाळी १० वाजता २५ किमी दूर राहणाऱ्या आपल्या आजी सलमा बीबीच्या घरी पोहोचून अफानने हातोडीने तिचं डोकं फोडलं. हत्या केल्यानंतर त्याने हातोडी स्वच्छ करून तिथून निघून गेला.
दुसरी हत्या: आजीच्या घरी हत्याकांड केल्यानंतर तो पाच किमी अंतरावर असलेल्या काकाच्या घरी गेला. तिथे पोहोचताच त्याने काका लतीफ यांच्यावर हातोडीने प्राणघातक वार करून त्यांचा जीव घेतला. त्यानंतर काकी सजिदालाही त्याने हातोडीचे अनेक घाव घालून ठार केले.
तिसरी हत्या: काका-काकीला ठार मारल्यानंतर अफान स्वतःच्या घरी परतला. तिथे त्याची भेट १३ वर्षीय धाकटा भाऊ एहसानशी झाली. त्याने हातोडीने एहसानच्या डोक्यावर वार करत त्याचा जीव घेतला.
चौथी हत्या आणि आईवर हल्ला: घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या आई शाहिदावर देखील त्याने हातोडीने वार केले. त्याला वाटले की ती मरण पावली आहे, मात्र पोलिसांनी तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.
पाचवी हत्या: त्यानंतर शेजारी राहणारी प्रेयसी फरशाना हिला बोलावून घेतले आणि तिलाही हातोडीने ठार केले.
हत्या केल्यानंतर आत्मसमर्पण आणि आत्महत्येचा प्रयत्न
घटनेनंतर अफान पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आत्मसमर्पण केल्यानंतर त्याने उंदीर मारण्याचे औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांचा तपास सुरू
अफानने सहा हत्यांची कबुली दिली असली तरी त्यापैकी एक जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अफानचा मोबाईल जप्त करून त्याचे कॉल रेकॉर्ड्स आणि ड्रग्ज सेवन करण्याच्या शक्यतेचा तपास सुरू केला आहे.
ही घटना कर्जाच्या संकटात अडकलेल्या कुटुंबाच्या दुर्दैवी परिस्थितीवर प्रकाश टाकते. पोलिसांकडून या हत्याकांडामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.