Udayanraje Bhosale : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. सावंत यांच्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. सावंत यांनी या फोन कॉलचे रेकॉर्डिंग *सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये धमकी देणारी व्यक्ती *ब्राह्मण समाजाच्या वर्चस्वाची भाषा करत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते.
“माझे नाव गुगलवर शोध. ब्राह्मणांना हलक्यात नको समजू. तुला तुझी जागा दाखवतो. जिथे बोलवशील तिथे येतो, तुझ्या घरात येऊन मारीन,” असे त्या व्यक्तीने धमकावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
किरण माने यांचा उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना सवाल
या घटनेनंतर अभिनेते किरण माने यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना थेट सवाल करत मराठा समाजावरील या प्रकाराबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले,
“छत्रपती शिवराय आणि मराठ्यांबद्दल अशा घृणास्पद विधानांवर तुम्ही काय भूमिका घेणार? आम्ही आपल्या आईबापांचा अपमान सहन करत लाचार राहायचं का?”
सावंत: “मी अशा धमक्यांना भीक घालत नाही”
इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“मला जी धमकी आली आहे, त्याला मी अजिबात घाबरत नाही. मी स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकारावर कठोर कारवाई करून सर्व समाजाच्या सुरक्षिततेचा संदेश द्यावा.”
सावंत यांनी सांगितले की, “सोमवारी मध्यरात्री १२ वाजता कोरटकर नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने जातीवाचक शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. हा महाराष्ट्र पेशव्यांचा आहे का, असेही त्याने विचारले. संभाजी महाराजांचा इतिहास मी कसा बदलू? ब्रिटिश काळापासूनचा इतिहास उपलब्ध आहे. पण तो खोटा सांगण्याची काहींची इच्छा आहे, मात्र आम्ही इतिहासाचा विपर्यास कधीही करणार नाही.”
संभाजीराजेंची कठोर कारवाईची मागणी
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला असून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले,
“छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अश्लाघ्य विचार मांडणारी ही विषवल्ली महाराष्ट्रात वाढते आहे, हे धक्कादायक आहे. समाजात दरी वाढवणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. सरकारने या कोरटकर नावाच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ही कुप्रवृत्ती अधिकच बळावेल.”
सरकारकडून कठोर कारवाईची मागणी
या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक *इतिहास अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आता सरकार या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.