Swargate : कंडोम, साड्या, अंतर्वस्त्र, स्वारगेटच्या बंद एसटीत काय काय सापडलं? हादरवणारे टाकणारे फोटो

Swargate : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटणला जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी स्वारगेट बस स्थानकात जोरदार आंदोलन केले. त्यांनी बस स्थानकातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनवर तोडफोड केली आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बस स्थानकातील धक्कादायक स्थिती
वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली असता, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसगाड्यांमध्ये कंडोम, साड्या आणि अंतर्वस्त्र सापडल्याचे आढळले. यावरून बस स्थानकात अवैध प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
“बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम सापडले आहेत, म्हणजे येथे दररोज गैरप्रकार घडतात. मग सुरक्षारक्षकांची केबिन कशासाठी?” असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला. त्यांनी सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
घटना कशी घडली?
सोलापुरहून आलेली बस पुन्हा सोलापूरला जाणार होती, मात्र ती फलटणमध्ये थांबेल असे सांगून आरोपीने पीडितेला बसमध्ये चढवले. तिच्यावर विश्वास संपादन करण्यासाठी तो तिला “ताई” असे संबोधत होता. बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर बस स्थानकातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.