ताज्या बातम्याक्राईमराजकारण

swargate : दारुच्या बाटल्या, साड्या, कंडोम, पुण्यातील बंद पडक्या शिवशाही एसटीत आणखी काय काय सापडलं?

swargate : स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बसस्थानकात जोरदार आंदोलन करत सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित केले. आंदोलनाच्या दरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड करण्यात आली असून, परिसरात आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने मोठा गहजब उडाला आहे.

बसस्थानकात सुरक्षेचा अभाव?

वसंत मोरे यांनी बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बसस्थानकात तब्बल २० सुरक्षा रक्षक असतानाही अशा घटना कशा घडतात? याचा अर्थ काहीतरी गंभीर गडबड आहे. सुरक्षा रक्षकांच्या संमतीशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, शिवशाही बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम्स, महिलांच्या साड्या, अंतर्वस्त्र, मद्याच्या बाटल्या आणि बेडशीट आढळून आल्याचा खुलासा मोरे यांनी केला. त्यामुळे येथे अनेक संशयास्पद आणि गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होत सुरक्षा व्यवस्थेवर हल्लाबोल केला. “जर सुरक्षा रक्षक काही करत नसतील, तर त्यांची केबिन इथे असण्याची गरजच नाही,” असे म्हणत त्यांनी बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली.

परिवहन प्रशासन आणि मंत्र्यांवरही निशाणा

या घटनेबाबत वसंत मोरे यांनी एसटी आगारप्रमुख आणि परिवहन मंत्र्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. “संपूर्ण परिसरात सुरक्षारक्षक असूनही अशा घटना घडतात, म्हणजेच प्रशासन निष्क्रिय आहे,” असे ते म्हणाले.

आगारप्रमुखांना या प्रकरणाची माहितीच नसल्याचे सांगण्यात आल्याने मोरे यांनी संताप व्यक्त केला आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली. जर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी

स्वारगेट बसस्थानकातील ही घटना *महिला सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही नियंत्रण, पोलिस गस्त आणि अधिक सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button