ताज्या बातम्या

Michelle Christine Trachtenberg : जगप्रसिद्ध अभिनेत्रीचा अवघ्या ३९व्या वर्षी अचानक मृत्यू; घरात आढळला मृतदेह, पोलीस तपासात..

Michelle Christine Trachtenberg : हॉलिवूड चित्रपटसृष्टीसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मिशेल क्रिस्टीन ट्रॅचटेनबर्ग यांचे वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी निधन झाले आहे. न्यू यॉर्कमधील त्यांच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्या मृत्यूमध्ये कोणताही संशयास्पद बाब आढळलेली नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. मिशेलच्या सोशल मीडिया पोस्टमधील बदलांमुळे काही चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मिशेल ट्रॅचटेनबर्ग यांनी टीव्ही आणि चित्रपट सृष्टीत मोठं नाव कमावलं होतं. ‘युरोट्रिप’, ‘आइस प्रिन्सेस’, ‘किलिंग केनेडी’, ‘सिस्टर सिटीज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तसेच, लोकप्रिय टीव्ही मालिका ‘गॉसिप गर्ल’मध्येही त्यांची भूमिका विशेष गाजली होती. २०२१ मध्ये ‘मीट, मॅरी, मर्डर ऑन टुबी’ या माहितीपट मालिकेचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.

मिशेल ट्रॅचटेनबर्ग यांच्या अचानक जाण्याने हॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Related Articles

Back to top button