ताज्या बातम्याक्राईम

Nandurbar : महादेवाच्या भजनासाठी निघालेल्या अर्टीगाचा भीषण अपघात, महाशिवरात्रीला घडलं आक्रित

Nandurbar : नंदुरबारमध्ये महाशिवरात्रीच्या भजनासाठी जात असलेल्या पाच युवकांच्या कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी अर्टिगा गाडी (क्र. MH-39-AJ-7154) विद्युत खांबावर धडकल्याने एका युवकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे चारच्या सुमारास नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप पुतळा ते खोडाई देवी मंदिर रस्त्यावर घडला.

भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटले, कार विद्युत खांबावर आदळली

हितेश शांतीलाल ईशी हा आपल्या मित्रांसह डूबकेश्वर महादेव मंदिराकडे भजनासाठी निघाला होता. त्याच्यासोबत हर्षल रवींद्र मराठे (१८), अविनाश युवराज देशमुख, नितेश मनोज पवार आणि रोशन संतोष नवसारे हे गाडीत होते. मात्र, वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडी खोडाई देवी चौकानजीकच्या विद्युत खांबावर धडकली.

स्थानीय नागरिकांची तत्परता, पण एकाचा जीव गेला

अपघाताचा मोठा आवाज झाल्याने मंदिर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी हर्षल रवींद्र मराठे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी रोशन संतोष नवसारे यांच्या फिर्यादीवरून गाडी चालक हितेश शांतीलाल ईशी याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Back to top button