Nagpur : लग्न जमल्यानंतर सहमतीने शारीरीक संबंध, पत्रिका वाटताना वराचा भयानक अपघात, लग्न मोडताच वधूने…

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकालात लग्न ठरवल्यानंतर सहमतीने झालेले शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकत नाहीत, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे उपवराविरोधात दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा आणि इतर आरोप न्यायालयाने रद्द केले. हा निकाल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील उपवराचे अमरावतीतील तरुणीसोबत लग्न ठरले होते. २८ मे २०२३ रोजी त्यांचा साखरपुडा झाला, आणि २६ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाह होणार होता. मात्र, पत्रिका वाटपाच्या काळात उपवराचा गंभीर अपघात झाला, त्यामुळे लग्न रद्द करण्यात आले. त्यानंतर उपवधूने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, उपवराला लग्नाचा कोणताही हेतू नव्हता, तरीही त्याने साखरपुड्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी उपवरासह त्याच्या भावाविरुद्ध आणि वहिनीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. नंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. मात्र, आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
६ एप्रिल २०२४ रोजी हे लग्न अधिकृतरीत्या रद्द झाले, तर उपवधूने २९ मे २०२४ रोजी बलात्काराची तक्रार केली. न्यायालयाने हे लक्षात घेतले की तक्रार उशिरा करण्यात आली असून, तिच्यामागे वैयक्तिक सूडभावना किंवा अन्य हेतू असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या वतीने ॲड. विश्वेश नायक आणि ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली.
पुण्यात बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी पोलिस कोठडीत
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तिला “ताई” म्हणून बोलावून शिवशाही बसमध्ये नेले, गळा दाबून अत्याचार केले आणि नंतर मारहाण करत पुन्हा बलात्कार केला.
पीडित तरुणीने आरोपीला “दादा, मला घरी जाऊ द्या” अशी विनवणी केली, तरीही त्याने ती दडपून ठेवली. तपासात असे समोर आले की आरोपीविरुद्ध जबरी चोरीचे सहा गुन्हे आधीच दाखल आहेत, ज्यापैकी पाच तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे महिलांकडे पाहण्याच्या त्याच्या विकृत मानसिकतेबाबत पोलिसांनी न्यायालयात दाखले दिले.
या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे