क्राईमताज्या बातम्या

Swargate : स्वारगेट अत्याचार प्रकरणात पोलिसांना सापडला मोठा पुरावा; पीडितेने डेपोत ‘या’ व्यक्तीला सांगितली होती आपबिती

Swargate : स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये २५ फेब्रुवारीच्या पहाटे घडलेल्या बलात्कार प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत. घटनेनंतर पीडित तरुणीने एका एसटी कंडक्टरला आपबिती सांगण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या कंडक्टरचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, तो या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोपीला अटक, पोलिस कोठडीत तपास सुरू

या प्रकरणातील मुख्य आरोपी, सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, सध्या लष्कर पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे.

वैद्यकीय चाचणीत महत्त्वपूर्ण निष्कर्ष

गाडेची ससून रुग्णालयात वैद्यकीय आणि लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली असून, चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय, डीएनए चाचणीसाठी त्याचे रक्त आणि केसांचे नमुने घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे

न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी शिवशाही बसची सखोल तपासणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे पुरावे आरोपीविरोधात ठोस आधार ठरू शकतात.

फसवणुकीने बसमध्ये नेले

पोलिस तपासात असे उघड झाले आहे की, आरोपी गाडे याने पीडित तरुणीची दिशाभूल करत स्वतःला एसटी कंडक्टर असल्याचे भासवले आणि तिला बसमध्ये नेले. एसटी कामगार असल्यामुळे तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा आणि स्वारगेट पोलिस करीत असून, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तपास अधिक जलद आणि सखोल करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Back to top button