ताज्या बातम्याक्राईम

Dattatray Gade : बायको पोरं असलेल्या दत्तात्रय गाडेचा खळबळजनक दावा; पोलिसांना म्हणाला, मी समलैंगिक, तृतीयपंथी

Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीने कंडक्टर असल्याचा बनाव करत हा गुन्हा केला. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली होती.

72 तासांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी पहाटे स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला गुणाट येथे अटक केली. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपीविरोधात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. तसेच, शुक्रवारी रात्री आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी ससून रुग्णालयात करण्यात आली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.

वकिलांचा नवा दावा – प्रकरणाला वेगळेच वळण?

या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. आरोपीच्या वकिलांनी हे संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी हा वाद पैशांच्या देवाण-घेवाणीमुळे उभा राहिल्याचे सांगितल्याने या संपूर्ण घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीच्या पत्नीनेही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यामुळे तपासाचा वेग अधिक वाढला आहे.

पोलिस तपास आणि फॉरेन्सिक पुरावे

पोलिसांनी आरोपीचे जबाब नोंदवले असून, त्याचे रक्त व केस डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. शिवाय, ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपीविरोधात ठोस पुरावे मिळाले आहेत.

आरोपीचा बचावाचा प्रयत्न – चलाखपणा उघड

आरोपीने पोलिस चौकशीत वेगवेगळ्या कारणांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने स्वतःला तृतीयपंथी असल्याचे सांगितले होते, मात्र तपासात हे दावे फोल ठरले. पोलिसांच्या मते, आरोपी अत्यंत शातीर असून कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचे प्रयत्न करत आहे.

न्यायालयाचा आदेश आणि पुढील तपास

पोलिसांनी न्यायालयात आरोपीला हजर केले असता, 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासादरम्यान डीएनए चाचणी अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीच्या निष्कर्षांवरून या प्रकरणाचा पुढील मार्ग निश्चित होणार आहे.

या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर आरोपीवर कठोर कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button