affair : मुलीच्या अफेअरची कुणकुण लागताच मुलाला घरी बोलवलं अन् अडकित्यात टाकून त्याचे तुकडे तुकडे केले

affair : आपल्या देशात आजही काही गावांमध्ये जातपंचायतींचे नियम आणि सामाजिक रूढी-परंपरा मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. त्यातूनच अनेकदा जातीय भेदभाव, ऑनर किलिंगसारखे गुन्हे घडतात. महाराष्ट्रात 12 वर्षांपूर्वी एका अशाच ऑनर किलिंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. 1 जानेवारी 2013 रोजी नगर जिल्ह्यातील सोनई गावात तीन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली.
नेमके काय घडले होते?
नगर जिल्ह्यातील सोनई गावात घडलेला हा प्रकार जातीय अहंकार आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली घडलेले ऑनर किलिंग होते. सचिन घारू नावाच्या तरुणाचे गावातील एका उच्चजातीय मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र, ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. त्यांनी सामाजिक प्रतिष्ठेचा हवाला देत सचिनची हत्या करण्याचा कट रचला.
नृशंस हत्याकांडाचा थरार
सचिन घारूला सेप्टिक टँक साफ करण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरच्यांनी घरी बोलावले. त्याच्यासोबत त्याचे दोन नातेवाईक, संदीप थनवार आणि राहुल कंडारे देखील गेले. तिघेही सेप्टिक टँकची साफसफाई करत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.
- संदीप थनवारला थेट सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले आणि गुदमरून मृत्यू झाला.
- राहुल कंडारेवर कोयत्याने वार करत त्याला ठार करण्यात आले.
- सचिन घारूला पकडून उस तोडण्याच्या अडकित्यात टाकून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्याच्या शरीराचे तुकडे विहिरीत आणि बोअरवेलमध्ये फेकण्यात आले.
दुसऱ्या दिवशी विहिरीत मृतदेहाचे तुकडे दिसल्यानंतर ही थरारक घटना उघडकीस आली.
सीआयडी चौकशी आणि न्यायालयाचा निकाल
ही घटना समोर आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 15 फेब्रुवारी 2013 रोजी प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवली. 25 मार्च 2013 रोजी सीआयडीने आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
- 53 साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपींना दोषी ठरवण्यात आले.
- सहा आरोपींना नाशिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
- मुख्य आरोपी पोपट दरंदलेचा न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला.
- उच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम ठेवली.
12 वर्षांनंतरही न्यायालयाचा कडक निर्णय कायम
या अमानुष हत्याकांडाने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. जातीय मानसिकतेमुळे अजूनही अशा घटना घडतात याची जाणीव या प्रकरणामुळे सर्वांना झाली. न्यायालयाने या गुन्ह्याला अत्यंत गंभीर मानत फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
सोनई ऑनर किलिंग प्रकरणाने जातिव्यवस्थेचे आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या चुकीच्या संकल्पनांचे काळे सत्य उघड केले. 12 वर्षांनंतरही हा क्रूर प्रकार समाजासाठी एक धडा आहे.