Shahu Maharaj : ‘औरंगजेबाच्या मुलीने शाहू महाराजांना पोटच्या पोरासारखं सांभाळलं, ती खूपच दयाळू होती’, मराठी अभिनेत्याची पोस्ट
Shahu Maharaj : बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर सध्या ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली असून, त्याच्या सोबत रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
सिनेमाच्या घोषणेनंतरच सोशल मीडियावर संभाजी महाराज आणि ऐतिहासिक संदर्भांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेक पॉडकास्ट तसेच राजकीय नेत्यांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे. अशातच, अभिनेता किरण माने यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित एक पोस्ट शेअर करत नवा विषय चर्चेत आणला आहे. त्यांच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला असला, तरी काहींनी नाराजीही व्यक्त केली आहे.
किरण माने यांनी शेअर केलेली ऐतिहासिक माहिती
किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये औरंगजेबाची मुलगी बेगम झीनत-उन-निसा हिच्या उल्लेखासह साताऱ्यातील बेगम मस्जिद या ऐतिहासिक वास्तूबाबत भाष्य केले.
ते म्हणाले की, सातारा शहरात असलेल्या या मशिदीचे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांनी केले. ही मशीद त्यांनी झीनत-उन-निसा हिच्या स्मरणार्थ उभारली होती.
झीनत-उन-निसाने संभाजीराजे धारातीर्थी पडल्यावर त्यांचा पाच वर्षांचा पुत्र शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई यांची मोठी काळजी घेतली. औरंगजेबाच्या कैदेत असूनही तिने त्यांच्यावर मातेसारखे प्रेम केले. त्यामुळे शाहू महाराजांनी तिच्या स्मृतीप्रित्यर्थ ही मशीद उभारली.
किरण माने यांच्या मते, इतिहासकारांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या संदर्भात झीनतवरही आरोप लावले. मात्र, शाहू महाराजांनीच तिला सन्मान दिला, हे वास्तव अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. झीनत-उन-निसा ही परोपकारी होती आणि तिने समाजातील गरिबांसाठी कार्य केले. औरंगजेबही तिच्या या कार्याने प्रभावित झाला आणि तिला ‘पादशाही बेगम’ ही पदवी दिली होती.
‘छावा’मध्ये झीनतच्या भूमिकेत डायना पेंटी
‘छावा’ चित्रपटात डायना पेंटी हिने शहझादी झीनत-उन-निसाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात झीनत औरंगजेबाच्या आदेशाचे पालन करणारी आणि संभाजी महाराजांना यातना देण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारी व्यक्तिरेखा म्हणून दाखवली आहे.
किरण माने यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांचे मत मान्य केले, तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज आणि झीनत-उन-निसा यांच्या इतिहासावर नव्याने चर्चा रंगू लागली आहे.