Suresh Dhas : सुरेश धसांचा खोक्या भाईबद्दल मोठा खुलासा, सतीश भोसले सोबतच्या संबंधांबाबत सगळंच सांगीतलं

Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याचे कारण म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याचा एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. विशेष म्हणजे, सुरेश धस यांनी सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याचे जाहीररित्या मान्य केले होते. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना त्यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.

सतीश भोसले कोण? सुरेश धस यांचे स्पष्टीकरण

“हा महाशय पारधी समाजाचा मुलगा आहे. त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यास मीच मदत केली आहे. काही लोक त्याला भोसले आडनाव लावून मराठा समाजाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो मराठा नाही. तो पारधी समाजाचा आहे. त्याची कोणतीही टोळी नाही, तो फक्त मुकादमांना लेबर पुरवण्याचे काम करतो. जर त्याच्याकडून काही चुकीचे झाले असेल, तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहणार नाही,” असे स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिले.

“सतीश भोसले माझा कारभार थोडा चालवतो का?”

सतीश भोसले याच्याशी असलेल्या नातेसंबंधांवर स्पष्टीकरण देताना सुरेश धस म्हणाले, “फेसबुकवर कोण कुणाला ‘बॉस’ म्हणतो, कोण कुणाचे ‘सरकार’ बनवतो, त्यावर माझा काहीही नियंत्रण नाही. अनेक लोक असे लिहितात, त्यामुळे माझ्यावर टीका करणे योग्य नाही. तो माझा कारभार चालवत नाही.”

“सतीश भोसले माझ्या गटात नव्हता”

यावर पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. “धनंजय मुंडे यांचा पूर्ण कारभार वाल्मिक कराड पाहायचा. त्याचप्रमाणे सतीश भोसले माझ्याशी फारसा संबंधित नाही. तो फक्त मुकादमांना कामगार पुरवतो, एवढीच मला त्याची माहिती आहे. तो काही दिवसांपूर्वी माझ्या विरोधात गेला होता, पंकजा ताईंच्या गटात सामील झाला होता. त्यामुळे तो माझा कट्टर समर्थक असल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल.”

“हा एवढा मोठा ‘खोक्या’ नाही”

सतीश भोसले याच्या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीवर सुरेश धस म्हणाले, “मी त्याच्या कृत्यांवर पांघरूण घालणार नाही. पण अजूनही पारधी समाज, भील समाज आणि अन्य अनुसूचित जमातींच्या जीवनात प्रगती आलेली नाही. त्याने अधिक पैसे कमावले, तो त्याचा प्रश्न आहे. त्याचा व्हिडीओ त्याने स्वतः तयार केला आहे. कदाचित कुणीतरी त्याला ‘खोक्या’ म्हणत असेल, पण तो एवढा मोठा खोक्या-बिक्या नाही.”

“सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्याच लागतात”

वाढदिवसाच्या शुभेच्छांबाबत बोलताना धस म्हणाले, “कधीकधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे विसरले जाते. कुणीतरी आठवण करून दिली, म्हणून मी ‘बिलेटेड’ शुभेच्छा दिल्या. तुम्हीही तुमचा जन्मदिवस सांगा, मी तुम्हालाही शुभेच्छा देईन!”


राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र

या संपूर्ण प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सुरेश धस यांच्या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्यावर टीका सुरूच असून, विरोधक हे कारण पुढे करत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळात या प्रकरणाला आणखी वळण मिळण्याची शक्यता आहे.