Rajasthan : खऱ्या मैत्रीचा अर्थ केवळ शब्दांत व्यक्त करता येत नाही, ती कृतीतून सिद्ध होते. राजस्थानमधील कोटपुतली-बेहरोड जिल्ह्यातील कुटीना गावात अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली, जिथे लष्करी जवानांनी १६ वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करून आपली मैत्री निभावली.
सुभेदार कंवरपाल सिंग हे १ जानेवारी २००९ रोजी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. त्या वेळी त्यांच्या सोबतच्या जवानांनी त्यांना एक वचन दिले होते – “तुझ्या मुलीच्या लग्नाला आम्ही नक्की येऊ.”
१६ वर्षांनंतर, ५ मार्च २०२५ रोजी, सुभेदार कंवरपाल सिंग यांच्या मुलीच्या विवाहासाठी त्यांचे २६ सहकारी सैनिक आवर्जून हजर राहिले. त्यांनी केवळ विवाहसोहळ्यात सहभागी होण्यापुरते मर्यादित न राहता, तिला स्वतःच्या मुलीसारखे स्टेजपर्यंत पालखीतून नेले आणि वडिलांसारखी सर्व विधी पार पाडल्या. कन्यादानापासून ते तिच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक क्षणात त्यांनी कुटुंबाची भूमिका निभावली.
या भावनिक क्षणांनी संपूर्ण गाव भावूक झाले. लग्नाच्या वेळी जवानांनी वधूच्या गाडीलाही धक्का मारत तिला पाठवणी केली. हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
शहादतीचा गौरव – कंवरपाल सिंग यांचे वीरगाथेचे स्मरण
सुभेदार कंवरपाल सिंग यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले होते. २००९ साली, राजौरी येथे रात्रीच्या गस्तीदरम्यान, त्यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले, पण स्वतः मात्र वीरमरण पत्करले.
आज, त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलेले वचन पूर्ण करून खऱ्या निष्ठेचे आणि बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की लष्करात केवळ सहकाऱ्यांचे नाते नसते, तर ते एक कुटुंब असते.
संपूर्ण देशभरातून या जवानांच्या या कृतीचे कौतुक होत आहे, आणि शहीद कंवरपाल सिंग यांना पुन्हा एकदा सन्मानाने आठवले जात आहे.