Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निर्धार शिबिरात विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप होत असला तरी, उद्धव ठाकरे यांनी आता जाहीरपणे मान्य केले की, महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत गाफील राहिली होती.
“गाफील राहिलो आणि चूक झाली” – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकायचं आहे या निर्धाराने लढलो, तर महायुती फक्त मोदींच्या नावावर निवडणुका लढवत होती. पण लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या, तेव्हा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाले. आम्ही जिंकलो आहोत अशी मानसिकता तयार झाली होती आणि अगदी मित्रपक्षांनीही विजय निश्चित मानला होता. मात्र, निकालानंतर काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक मोठी चूक झाल्याचे कबूल केले.”
“लोकांना आपलं काम सांगण्यात अपयश”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आम्ही सरकार उत्तम चालवलं होतं, कोरोना काळात महाराष्ट्र थांबू दिला नाही, पण हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आलं. उलट आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून विरोधकांनी वातावरण निर्माण केलं. संजय राऊत यांना तुरुंगात टाकण्यात आलं, पण शेवटी सोडून द्यावं लागलं. काहीजण शेपट्या घालून त्यांच्या गोटात गेले आणि तिथे जणू गंगास्नान घातल्यासारखे निर्दोष झाले,” असा टोला त्यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या घोडचुका
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी महाविकास आघाडीला विजयाची खात्री होती. मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत चर्चाही सुरू होती. मात्र, जागावाटपावरून संघर्ष, काही ठिकाणी झालेली बंडखोरी, आणि आत्मसंतोषाच्या मानसिकतेमुळे आघाडीला फटका बसला. हेच सत्य उद्धव ठाकरे यांनी आता जाहीरपणे मान्य केले आहे.
महाविकास आघाडीने आता आगामी निवडणुकांसाठी कोणती रणनीती आखावी, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.