Tanishq : तनिष्क शोरुमवर सशस्त्र दरोडा, 25 कोटींचे दागिने लुटले, दोघांच्या पायात गोळ्या घातल्या, २ पोती दागिने जप्त

Tanishq : बिहारमधील अराह येथील गोपाली चौक परिसरातील तनिष्क शोरूममध्ये सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर दरोडा पडला. तीन दुचाकींवर आलेल्या सहा चोरट्यांनी तब्बल 25 कोटी रुपयांचे दागिने लुटले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाठलाग केला, त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन आरोपींना गोळ्या लागल्या आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दोन पोती भरून दागिने, दोन पिस्तुलं आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मात्र, उर्वरित चार चोरटे मोठ्या प्रमाणात दागिने घेऊन फरार झाले.

कसा घडला हा दरोडा?

सोमवारी सकाळी १०.३० वाजता, तीन दुचाकींवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी शोरूमच्या गार्डला मारहाण केली आणि त्याचे हत्यार हिसकावले. त्यानंतर शोरूममध्ये प्रवेश करत त्यांनी आतून शटर बंद केले आणि २२ मिनिटे लूटमार केली. शोरूममध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचे दागिने होते, त्यातील २५ कोटींचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने चोरट्यांनी लुटले.

पोलिसांची वेगवान कारवाई

भोजपूरचे एसपी राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी त्वरित हालचाली सुरू केल्या. लुटीचे सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करण्यात आली. त्यानंतर बाबुरा छोट्या पुलाजवळ संशयितांना दुचाकीवरून जाताना पाहण्यात आले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन आरोपी जखमी झाले.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची ओळख विशाल गुप्ता (दिघवारा, सारण) आणि कुणाल कुमार (सेमरा, सोनपूर) अशी झाली आहे. त्यांच्याकडून दोन पोती भरलेले दागिने जप्त करण्यात आले असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.

शोरूम कर्मचाऱ्यांचा थरारक अनुभव

शोरूम गार्ड मनोज कुमार यांनी सांगितले की, “शोरूम उघडल्यानंतर काही वेळातच सहा जण आले. नियमांनुसार चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र आत प्रवेश करण्याची परवानगी नाही. त्यामुळे आधी दोन जण आत गेले, आणि उर्वरित चार जणांनी प्रवेश करताच त्यांनी मला पिस्तूल लावली आणि मारहाण केली.”

तनिष्कच्या सेल्सगर्ल सिमरन हिने सांगितले की, “मी २०-२५ वेळा पोलिसांना फोन केला, पण त्वरित प्रतिसाद मिळाला नाही. दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल घेतले आणि कपाळावर शस्त्राने वार केले. त्यांच्या हातात दोन-दोन शस्त्रे होती. त्यांनी सर्व दागिने भरून घेऊन पळ काढला.”

पुढील तपास सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास भोजपूर पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. शहरात सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असून, सराफा व्यापाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.