Virat Kohli : भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि देशभरात आनंदोत्सव साजरा झाला. मात्र, उत्तर प्रदेशातील देवरिया येथील पांडेय कुटुंबावर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील १४ वर्षीय प्रियांशी पांडेय हिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबाच्या आनंदावर पसरली शोककळा
प्रियांशी आणि तिचे कुटुंबीय भारत-न्यूझीलंडचा अंतिम सामना पाहत होते. त्यांनी न्यूझीलंडची फलंदाजी पाहिली, त्यानंतर भारताची फलंदाजी सुरु झाली. सामना रंगतदार होत असतानाच अचानक प्रियांशी बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
कोहलीच्या बाद होण्यामुळे मृत्यू? अफवांचे खंडन!
प्रियांशीच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काही माध्यमांमध्ये “विराट कोहली अवघ्या १ धावेवर बाद झाल्यामुळे तिला धक्का बसला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला” असा दावा करण्यात आला. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याचे तिचे वडील अजय पांडेय यांनी स्पष्ट केले.
“प्रियांशीचा मृत्यू आणि विराटच्या बाद होण्याचा कसलाही संबंध नाही. मी त्या वेळी बाहेर होतो. मला फोन आला आणि सांगण्यात आलं की ती अचानक बेशुद्ध पडली. आम्ही तिला तातडीने रुग्णालयात नेलं, पण तिचा मृत्यू झाला होता,” असे त्यांनी सांगितले.
सामन्याच्या वेळी प्रियांशी कोसळली, पण कारण वेगळं!
प्रियांशी जेव्हा कोसळली तेव्हा भारताची फलंदाजी सुरु होती, ही बाब खरी आहे. मात्र, त्या वेळी भारतीय संघाची स्थिती मजबूत होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शानदार सुरुवात दिली होती, आणि विराट कोहली तेव्हा फलंदाजीला आलेलाही नव्हता. त्यामुळे विराटच्या बाद होण्यामुळे तिला धक्का बसला आणि त्यातून तिचा मृत्यू झाला, हा दावा पूर्णपणे निराधार आहे, असे तिच्या वडिलांनी स्पष्ट केले.
कुटुंबाच्या दु:खात संपूर्ण गाव सहभागी
प्रियांशीच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गावकऱ्यांनीही या दु:खात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांना सांत्वन दिले. या दुर्दैवी घटनेमुळे क्रिकेटच्या आनंदावर दुःखाचा गडद रंग चढला आहे.