Uttar Prades उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे 7 मार्च रोजी एक दुर्दैवी घटना घडली. नवविवाहित दाम्पत्य प्रदीप आणि शिवानी यांच्या हनिमूनदरम्यान त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.
लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री प्रदीप आणि शिवानी आपल्या खोलीत गेले. मात्र, सकाळी त्यांचा दरवाजा उघडला न गेल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. आत पाहताच सर्वांनाच धक्का बसला. शिवानीचा मृतदेह बेडवर पडला होता, तर प्रदीपने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.
पोलीस तपासानुसार, प्रदीपने आधी शिवानीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. दरवाजा आतून बंद असल्याने तिसऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीचा संशय कमी आहे. दोघांचे मोबाईल तपासले जात असून, त्यातील कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
प्रदीपच्या मोबाईलवर एक अनोळखी संदेश आल्याचे समोर आले आहे. हा संदेश कोणी पाठवला आणि त्यात काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंदाजानुसार, प्रदीप आणि शिवानीमध्ये लग्नाच्या रात्री वाद झाला होता. प्रदीपने शिवानीला तिच्या पूर्वीच्या प्रेमसंबंधांबाबत विचारले होते, ज्यामुळे तणाव निर्माण झाला. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.
7 मार्च रोजी प्रदीप आणि शिवानी यांचे लग्न मोठ्या आनंदात पार पडले होते. दोघेही खुश होते आणि आपापसात गप्पा मारत होते. त्यांच्या संमतीने हे लग्न ठरले होते. रविवारी त्यांच्या रिसेप्शनची तयारी सुरू होती. मात्र, अचानक ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, घरी पोहोचल्यावर सर्वजण शोकाकुल अवस्थेत होते.
ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास पोलीस करत असून, लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.